ज्वालामुखी केला प्राशन!
ज्वालामुखी केला प्राशन!
एकदा एक मोठा प्रसंग उभा राहिला. प्रत्यक्ष अग्नीने ज्वालामुखीच्या रुपात आग ओकायला सुरुवात केली. नागरिकांना उष्णतेचे चटके सहन होत नव्हते. ज्वालामुखीचा डोंगर तयार झाला होता. चुलीतील लाकडे आपोआप पेटत होती. डोंगराच्या कपारी खाली कोसळल्या. घरे, गाव पेटण्याची चिन्हे दिसत होती. हनुमानाने विचार केला, 'हा ज्वालामुखी थांबवला नाहीतर हा असाच चोहीकडे पसरत जाईल. किती नुकसान होईल, किती लोकांचे प्राण जातील सांगता येत नाही. लोकं घर सोडून पळू लागले. बाल हनुमानाने ज्वालामुखी पर्वताच्या दिशेने उड्डाण केले. त्याने त्या पेटलेल्या डोंगराचे मोठमोठे भाग वेगळे करायला सुरुवात केली.
तिकडे केसरीराजा आणि अंजनी हनुमानाला शोधत होते. त्यांना हनुमानाचे मित्र भेटले. केसरीने विचारले, "मारुती कुठे आहे?"
"त्याने आम्हाला अग्नीपासून वाचवले आहे. तो आता त्या आगीने पेटलेल्या पर्वताच्या दिशेने गेला आहे. तो त्या आगीला शांत करणार आहे."
"हा आपला मारुती...." अंजनी काहीतरी बोलणार तितक्यात कुणीतरी ओरडले,
"महाराज, बघा. त्या आगीच्या ज्वाळा आपल्याकडे येत आहेत."
"अरे, लवकर इथून चला. ते आगीचे गोळे आपल्याला भस्म करून टाकतील." राजा म्हणाला. तसे सारे पळत सुटले. सारे जण परमेश्वराची प्रार्थना करू लागले. अंजनी चिंताग्रस्त झाली. तिच्या डोळ्यात पाणी आले.
"ह्या मुलांना हनुमानाने वाचवले याचा अर्थ तो स्वतः कुशल आहे." राजा बोलत असताना धावत आलेला एक सेवक म्हणाला,
"पूर्ण गाव आगीच्या लाटांनी घेरले आहे. कुणी बाहेर जाऊ नये. लाव्हा लवकर शांत होणार नाही. त्याला शांत होण्यासाठी तीन-चार दिवस लागू शकतात."
"हा ज्वालामुखी खाली गावात पोहोचण्याची शक्यता आहे. माणसं स्वतःला वाचवू शकतील. पण जनावरे, पक्षी स्वतःला नाही वाचवू शकतील. मलाच काहीतरी करावे लागेल." तिकडे असा विचार करीत असलेल्या हनुमानाला एक गोष्ट आठवली. हनुमान जन्मल्याबरोबर सूर्याला खाण्यासाठी गेला होता. तेव्हा शंकराने आणि इतर देवतांनी त्याला आशीर्वाद दिला होता. अग्नीदेवानेही त्याला माझ्या पासून भीती असणार असा वर दिला होता. असे वरदान आठवताच हनुमान प्रचंड वेगाने जाणाऱ्या ज्वालामुखीच्या समोर उभा राहिला. त्याने आपले तोंड उघडले. जबडा जेवढा मोठा करता येईल तेवढा मोठ्ठा केला. त्याबरोबर त्या ज्वालामुखीच्या लाटा त्याच्या तोंडात शिरू लागल्या. कुणीतरी ओरडले,
"बाप रे बाप! बघा आपला मारुती सगळी आग पिऊन घेतोय...."
सर्वांनी वर बघितले. सर्वांना दिसले भांड्यातील पाणी प्यावे तसा मारुती आगीच्या लाटा पोटात घेत होता. ते पाहून अनेक जण भीतीने थरथर कापू लागले. काही लोक ओरडू लागले. अंजनी माता खूप घाबरली. राजा केसरीच्या जीवात जीव राहिला नाही. स्वर्गातील देव तो प्रकार पाहून आनंदी होत होते. काही क्षणातच तो संपूर्ण ज्वालामुखीचा पर्वत हनुमानाच्या मुखातून साऱ्या शरीरात पसरला. अग्नी शांत झाला. मोठ्ठे संकट हनुमंतामुळे टळले. हे जमलेल्या लोकांच्या लक्षात आले. सर्वांनी हनुमंताचा जयजयकार केला. घाबरलेली अंजनी ओरडली,
"हनुमान, तू हे काय केले आहेस? का असे केलेस? तुला कुठे भाजले तर नाही ना? जखम तर झाली नाही ना?"
हनुमंत लगेच उड्डाण करून खाली आला. सर्वांनी पुन्हा जयजयकार केला. हनुमानाच्या सर्वांगातून धूर निघत होता. अंजनीला पुढे बोलू न देता तो म्हणाला, "माते, थांब...." हनुमंत बोलत असताना त्याला अचानक उलटी झाल्यासारखे झाले. शरीरात गेलेले अग्नीचे गोळे बाहेर पडले. त्यामुळे शांत झालेला हनुमान म्हणाला,
"माते, तूच तर म्हणाली होती, जेव्हा आवश्यकता पडेल, संकट येईल तेव्हा तुझ्याजवळ असलेल्या शक्तीचा उपयोग कर. बघ, संकट टळले आहे." तितक्यात हनुमानाच्या लक्षात आले की, जमलेले काही लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहत आहेत. काही लोकांच्या मनातील भीती अजून गेली नाही. विचारले,
" काय झाले? तुम्ही सारे माझ्याकडे असं काय बघत आहात? सारे जण सुरक्षित आहात. त्रास होणार नाही. आता घरी जा. बाबा, चला. आता आपण राजवाड्यात जाऊया." हनुमान म्हणाला. सारे नागरिक आनंदाने आपापल्या घरी निघाले. तितक्यात स्वतः हनुमानासह सर्वांचे लक्ष त्याच्या शरीराकडे गेले. अंजनीने त्याला हात लावला. तेव्हा तिचा हात भाजला. हनुमान सर्वांना घेऊन एका मोठ्या तलावाजवळ आला. त्याने तलावात उडी मारली. काही वेळात हनुमान पूर्वीसारखा स्वस्थ झाला.
००००
नागेश शेवाळकर पुणे,
(९४२३१३९०७१)